लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक वीरांगना स्थूलवाचन | Leftanant Swati mahadik Sthulvachan Question Answers
(भाग - 1)
( पान नं. : ५९ आणि ६० )
लेफ्टनंट स्वाती
संतोष महाडिक
प्र. (१) खालील आकृती पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
प्र. (२) ‘कठोर
परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
पतिनिधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत
लोटल्या गेल्या होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाट्टेल ती दुःखे सहन
करु शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिम्मत माणसांमध्ये असते.
इथे तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता. त्यातच दोन
मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येऊन पडली होती.
दुसरी एक गोष्ट स्वार्तीच्या मार्गात आडवी
येणार होती. ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतेही धाडसी काम
करण्यास तरुण मन मागेपुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या चाळिशीत पोहोचल्या
होत्या. या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक-मानसिक बळ कमी असण्याचा
संभव असतो. तसेच, त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला
होता. तेथील जीवन तर आत्यंतिक खडतर होते. तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक
असते. आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते.
या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे
लागणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचेच, असा स्वाती यांचा पक्का निर्धार होता. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची मानसिक
तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतलेसुद्धा. म्हणूनच त्यांना
स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला.
प्र. (३) ‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
स्वाती
महाडिक यांनी पतीनिधनाचे असीम दुःख झेलले. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय
झाल्या नाहीत. आपल्या पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण
करण्याचा त्यांनी निर्धार केला. एवढेच नव्हे तर तो निर्धार त्यानी पुरा केला. या घटनेचा
समाजावर प्रभाव पडलाच. समाजाला त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळाला.
आपल्या
समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज
अनुकूल असतो. हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो.
स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते, स्त्रिया सैनिकांचे
काम करूच शकणार नाहीत, अशीच समाजाची धारणा असते. या
पार्श्रभूमीवर, स्त्रिया पुरूषांइतक्याच सक्षम असून सैनिकांचे
कामही करू शकतात, असा संदेश समाजाला मिळतो.
प्र. (४) टिपा लिहा.
(अ) देशप्रेमी
कर्नल संतोष महाडिक
उत्तर:
कर्नल
संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती. त्यासाठीच त्यांनी सैन्यदलात प्रवेश
केला. त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा त्यांच्या भोवतालच्या
लोकांवर प्रभाव पडला होता. अचानक १७ नोव्हेंबर २०१५ रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये
दहशतवाद्यांनी हल्ला केला. भारताच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला होता.
महाडिक
यांच्या बटालियनकडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली गेली.
महाडिक यांनी प्राणपणाला लावून दहशतवाद्यांचा निःपात केला. दुर्देवाने त्या कारवाईमध्ये
कर्नल संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान
सैनिक गमावला.
(आ) जिद्दी
लेफ्टनंट स्वाती महाडिक
उत्तर:
लेफ्टनंट
स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्या निर्धाराच्या पूर्तीमधून
दिसते. पतीचे अंत्यविधी चालू होते, त्याच वेळी स्वाती
यांच्या मनात त्यांचा निर्णय पक्का झाला. त्या वेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या
वयाच्या अटीत बसत नव्हत्या. तरीही अर्ज-विनंत्या करून त्यांनी वयाची अट शिथिल करून
घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा खूप कठीण असते. खूप कष्ट घेऊन त्यांनी ती
परीक्षा यशस्वी रीतीने पार केली.
त्यानंतरचे
चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण यशस्वी
रितीने पूर्ण केले. लेफ्टनंट म्हणून त्या सैन्यदलात दाखल झाल्या. कर्तबगारीने
खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले. पतीचे स्वप्त नष्ट होऊ दिले नाही. एक सर्वसाधारण
स्त्री समाजाला ललामभूत ठरली. हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे घडू शकले.
प्र. (५) ‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
स्वातींनी
काय केले?
त्यांनी प्रथम स्वतःसमोर आलेली परिस्थिती नीट समजून घेतली. आपण काय
काय करू शकतो, याचा त्यांनी अंदाज घेतला. त्यानुसार निर्णय
घेतले. एकदा निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्याला अमुक
अमुक गोष्ट नक्की करता येतील, असा त्यांनी विश्वास बाळगला.
कठोर परिश्रम घेतले. परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. योजलेल्या मार्गावर
त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या. त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचल्या.
यश
म्हणजे वेगळे काय असते? फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या
दिशेने न घाबरता, कच न खाता ठामपणे पावले टाकणे आणि त्यासाठी
आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजेच यश. स्वाती यांच्या जीवनकार्यावरून हे लक्षात
येते.
प्र. (६)‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
होते
काय की,
आपल्याला काय करायचे आहे, आपले ध्येय कोणते
आहे, हे आपण नक्की करतो आणि पावले टाकायला सुरूवात करतो.
अर्ध्यावर गेल्यावर ध्येयाच्या दिशेने आपण चाललेलो नाही हे लक्षात येते. मग आपण
मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो. पण आपण मुक्कामाला पोहोचतच
नाही. त्याचे कारण साधे आहे. आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून
मुक्कामापर्यंतचा, शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे, त्याचा आपण विचारच करीत नाही.
खरे
तर,
या मार्गाचा तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक
पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे. काही कृतींचा
मिळून एक टप्पा, याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरवले
पाहिजेत. प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल, कोणती साधने
वापरावी लागतील, हेसुद्धा निश्चित केले पाहिजे. याप्रमाणे तयारी
केली की यश नक्कीच मिळते. तयारी म्हणजेच नियोजन होय. म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा
नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे, हेच खरे.
वीरांगना स्थूलवाचन स्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी
प्र. (७) हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा
उत्तर:
स्वाती यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आणलेसुद्धा. पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करायला घेतले, या तऱ्हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून ठेवायचा मार्ग निवडला. एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीची कर्तबगारी, विचार,तत्त्वे यांचाही एक प्रकारे अंत होत असतो. मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही. किंबहुना कोणत्याही माणसाला अमर करू शकत नाही. तर मग आपली प्रिय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार? तर त्यांच्या आठवणी जाग्या ठेवून. त्या व्यक्तींचे कर्तुत्व, त्यांचे विचार, त्यांनी उराशी बाळगलेली तत्त्वे जिवंत ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या ठेऊ शकतो. किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मला या विचाराची देणगी प्रस्तुत पाठाने दिली आहे.
*******
महत्वाचे
वीरांगना (स्थूलवाचन) या पाठाखालील पान नं. ६१ आणि ६२ वरील प्रश्न उत्तरे पुढील भागात देण्यात आली आहेत. पुढील उत्तरे पाहण्यासाठी खालील view बटनावर क्लिक करा.